मुंबई - मुंबईत शुक्रवारी (दि. 3 जुलै) पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यावेळी येत्या 24 तासात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत आज (दि. 4 जुलै) सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावल्याने दादर, हिंदमाता, माटुंगा किंगसर्कलसह अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे पाणी साचलेल्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 24 तासात अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
पालिकेचा दावा फोल
हिंदमाता येथे पाणी साचलेल्या ठिकाणी पोलीस नागरिकांना आणि पाण्यात आडकेल्या वाहनांना मार्ग काढून देत होते. हिंदमाता येथे पाणी तुंबू नये म्हणून पालिकेने पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता दुप्पट केली आहे. यामुळे पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा लवकर होईल, असा पालिकेने केलेला दावा आजच्या पावसाने फोल ठरविला आहे.
इतक्या पावसाची झाली नोंद
मुंबईत आज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुलाबा येथे 66 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 111.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालिकेच्या पाऊस मोजणी केंद्रावर शहर विभागात 88.91, पूर्व उपनगरात 82.69, पश्चिम उपनगरात 88.67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हिंदमाता, शक्कर पंचायत रोड वडाळा, धारावी क्रॉस रोड, सरदार हॉटेल काळाचौकी, एसआयइएस कॉलेज माटुंगा, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर ब्रिज, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, नॅशनल कॉलेज बांद्रा
पडझड
मुंबईत चार ठिकाणी घर व घरांचा काही पडल्याच्या घटना घडल्या. 32 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या तर 10 ठिकाणी शॉकसर्किटच्या घटना घडलली, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंदीवरुन मिळाली. वॉलकेश्वर येथील सम्राट अशोक सोसायटी येथे भिंत कोसळली. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणालाही मार लागलेला नाही.
हेही वाचा - जेव्हीएलआर रस्ता खचल्याने वाढतेय अपघातांचे प्रमाण; प्रशासनाचे दुर्लक्ष