मुंबई - मुंबईकर ऐन थंडीचा अनुभव घेत असताना बुधवारी शहरासह उपनगरांत हलक्या सरीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. जोरदार कोसळणाऱ्या सरींमुळे मुंबईकरांच्या नाताळ साजरा करण्याच्या उत्साहावर पाणी फिरले. तसेच, पुढील २ दिवसांत पुन्हा पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा सिडकोसमोर मुक्काम मोर्चा
येत्या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, मराठवाडा,मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. अशातच कर्नाटक, केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे, अरबी समुद्रावरची आर्द्रता खेचून घेतली जात आहे. यामुळे शहरात पाऊस पडत आहे. नोव्हेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. अखेर संध्याकाळच्या दरम्यान पश्चिम आणि पूर्व उपनगरात अंधेरी पावसाने हजेरी लावली.
शहरात पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, बुधवारी आणि गुरुवारीही हलक्या सरीचा पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, शेतीच्या दृष्टीकोणातून आधीच पावसाबद्दलचे पुर्वानुमान देण्यात आले होते. कारण, या ढगाळ वातावरणामुळे पिकांची नासाडी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.