गुरुग्राम : Body of model Divya Pahuja found : हत्येच्या 11 दिवसांनंतर मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह फतेहाबादच्या टोहाना कालव्यात सापडला. गुरुग्राम पोलिसांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपी बलराजने मृतदेह कालव्यात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्याआधारे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम राबवली. त्यानंतर मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह फतेहाबादच्या टोहाना कालव्यात सापडला.
तोहाना कॅनॉलमध्ये मृतदेह सापडला : दिव्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची 25 सदस्यीय टीम पटियालाला पोहोचली होती. याशिवाय एनडीआरएफची टीम गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसोबत दिव्याच्या मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र, शनिवारी सकाळी हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना कॅनॉलमधून दिव्याचा मृतदेह सापडला. कालव्यातून मृतदेह काढल्यानंतर पोलिसांनी दिव्याचं छायाचित्र कुटुंबीयांना पाठवलं. त्यानंतर तिच्या मृतदेहाची ओळख पटली.
हरियाणा पोलिसांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेतला : गुन्हे शाखेचे सहा पथक दिव्याच्या मृतदेहाच्या शोधात व्यस्त होते. 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलमध्ये दिव्या पाहुजा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने ही घटना घडवून आणली. या प्रकरणी पोलिसांनी बलराज नावाच्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली होती. ज्याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिव्याच्या मृतदेहाची माहिती दिली. त्या आधारे हरियाणा पोलिसांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
कोलकाता विमानतळावरून अटक : आरोपी बलराजने पोलिसांना सांगितले की, त्याने दिव्याचा मृतदेह टोहाना कालव्यात फेकून दिला होता. दिव्याच्या हत्येतील मुख्य आरोपी अभिजीत सिंग याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिल याच्याकडे सोपवली होती. या घटनेनंतर बलराजने देश सोडून बँकॉकला पळून जाण्याचा विचार केला होता. परंतु, पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी बलराज आणि त्याचा सहकारी रवी बंगा यांना कोलकाता विमानतळावरून अटक केली.
10 लाख रुपये दिले : बलराजने दिव्याचा मृतदेह अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारच्या ट्रंकमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली होती. या कामात रवी बंगा त्यांना साथ देत होता. अभिजीत सिंगने त्याच्या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांसह दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारच्या ट्रंकमध्ये ठेवला. त्यानंतर अभिजीतने त्याचा साथीदार बलराज याला गाडीची चावी दिली आणि दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं. या कामासाठी अभिजीतने बलराजला 10 लाख रुपयेही दिले होते.
हेही वाचा :
1 महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली जबरदस्त कामगिरी
2 प्रभास, प्रशांत नीलसह टीमने साजरी केली 'सालार सक्सेस पार्टी'
3 राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई