पालघर - विरारमधील आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकत हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. स्वागत बंगलो, वर्तक वाॅर्ड विरार पश्चिम येथे ४ मे च्या रात्री ११.४३ ते ११.५० दरम्यान हा हल्ला झाला आहे. हिरव्या रंगाच्या यामाहा फसीनो स्कूटरवरून येऊन, पेट्रोल भरलेल्या काचेच्या बाॅटलमधील कोंबलेल्या कपड्यास आग लावून ती पेटती बाॅटल हार्दिक पाटील यांच्या राहत्या बंगल्यामधील गेटच्या आतील भागात फेकून हा हल्ला करण्यात आलेला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घराबाहेरील गवत व झाडे यांना आग लागून नुकसान झालं आहे. या हल्ल्यावेळी आयर्नमॅन हार्दिक पाटील घरात उपस्थित नव्हते. मात्र इतर सर्व कुटुंबीय घरामध्येच होते.
हल्ला कोणी आणि का केला याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट
आयर्नमॅन स्पर्धेसाठी भारतीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हार्दिक पाटील यांची नोंद आहे. हार्दिक पाटील हे आंतरराष्ट्रीय पातळीचे भारतीय खेळाडू असून ते आयर्नमॅन पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत. आतापर्यंत १० पूर्ण तसेच १६ अर्ध आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेले ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. अशा प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरावर अशाप्रकारे खुलेआम हल्ला झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद
या सर्व प्रकरणानंतर हार्दिक पाटील यांनी विरार पोलिस ठाणे येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देऊन गुन्हा नोंद केलेला आहे. हार्दिक पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अत्यंत मानसिक तणावात असून, काही वैयक्तिक समस्यांनी त्रस्त असल्याबाबतची माहिती मिळत आहे.तसेच त्यांना काही व्यक्तींमार्फत सतत फोनमार्फत धमक्या येत असून त्यांच्या जीवास धोका असल्याबाबतची तक्रारदेखील त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली आहे.पोलीस याबाबत तपास करीत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली आहे.
हेही वाचा-औरंगाबाद : मुर्गी शेख हत्याप्रकरणातील आरोपींना अखरे अटक