मुंबई - राज्यातील आरटीओमध्ये वाहन परवाना काढताना वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग करावे लागते. मात्र, मुंबईसह ठाणे व पुणे या मेट्रो शहरांमधील काही आरटीओंमध्ये पुढील तीन महिन्यांत एकही स्लॉट उपलब्ध नसल्याने शिकाऊ वाहन चालकांच्या त्रासात भर पडत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे परवान्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
परिवहन विभागाला मोठे यश -
मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्ये वाहनांच्या संख्येसह वाहन चालकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालया(आरटीओ)मध्ये शिकाऊ व इतर परवाने काढण्यासाठी गर्दी होत आहे. यावर तोडगा म्हणून परिवहन विभागाने घरबसल्या शिकाऊ परवाना काढण्याची सुविधा काहीच महिन्यांपूर्वी सुरू केली. मात्र, शिकाऊ परवाना घेतलेल्या चालकांना एक महिन्यानंतर पक्का परवाना काढण्यास आवश्यक चाचणी देण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागत आहे. आरटीओमध्ये जाताना पूर्व नोंदणी किंवा स्लॉट बूक करणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंगमुळे दलालांना आळा घालण्यात परिवहन विभागाला मोठे यश आले आहे. मात्र, मुंबईसह ठाणे व पुणे या मेट्रो शहरांमधील काही आरटीओंमध्ये पुढील तीन महिन्यांत एकही स्लॉट उपलब्ध नसल्याने शिकाऊ वाहन चालकांच्या त्रासात भर पडत आहे.
तातडीची बैठक -
बहुतेक आरटीओंमध्ये सहज स्लॉट उपलब्ध होत असल्याने चालकांच्या पैशांसह वेळेचीही मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. मात्र, सात ते आठ आरटीओंमध्ये वाहन चालकांना या सेवेचा त्रास होताना दिसत आहे. दररोज संगणकासमोर बसल्यानंतरही काहीच वेळेत स्लॉट बुकिंग फुल्ल होत असल्याने दोन ते तीन महिन्यांच्या प्रतीक्षा करावी लागत आहे. याउलट काही आरटीओमध्ये तीन महिन्यांपर्यंत एकही स्लॉट दिसत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
हे ही वाचा - विशेष : आनंदमय दिवाळीत स्वस्थ राहणंही गरजेचं; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला