मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरित्राची आणि त्यानी घडविलेल्या पराक्रमाची इत्यंभूत माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या दृष्टीने अनेकजण झपाटून जातात. महाराष्ट्रात जागोजागी अनेक गावात गड किल्ल्यांच्या रूपाने राजांच्या लढवय्या वृत्तीची अनुभूती घेता येते. अशीच मुंबईत राहणारी हमिदा खान (Mountaineer Hamida Khan) ही दुर्गकन्या आज महाराजांच्या गड किल्ल्यांनी इतकी प्रभावीत झाली आहे की आतापर्यंत त्यांनी ४०० गड किल्ले (climbed 400 forts) सर केले असून हा एक ध्यास घेऊन त्या पुढे जात आहेत.
दौऱ्याची शिस्तबद्ध आखणी : हमिदा खान यांचा भटकंतीचा प्रवास शालेय जीवनात इतिहासाच्या आकर्षणातून सुरू झाला. हसण्या, खेळण्याचं वय परंतु तिला प्रवासात नेहमीच दूरवर दिसणारे किल्ले खुणावत असत. त्यात ती ओढली गेली आणि नंतर घरच्यांच्या विरोधाची पर्वा न करता घराबाहेर पडली. शिवतीर्थ रायगडावर महाराजांचं स्मरण करून त्यांना आपल्या श्रद्धास्थानी जागा देऊन भ्रमंतीला प्रारंभ केला. यात भुईकोट, सागरी किल्ले, डोंगरी किल्ले असे बरेच प्रकार तिने अनुभवून ती माहिती संकलित केली. आपल्या नोकरीमध्ये सुट्टीच्या दिवसांचा सदुपयोग करीत प्रत्येक दौऱ्याची शिस्तबद्ध आखणी करत असे. अण्णा परब हे गड किल्ल्यांचे संशोधक, गाढे अभ्यासक ते तिच्या त्या वेळी अंदाजे २५ एक वर्षापूर्वी संपर्कात आले. त्यांनी तिला गड किल्ले पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला आणि तिची जिद्द वाढवली. हा छंद म्हणजे जिवावर बेतणारा. एका मुलीने अशा निर्जन स्थळी एकट्याने भटकणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देणे. परंतु 'ट्रैकिंग, रॉक क्लाइंबिंग छंदाबद्दलची तिची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली.
एका वर्षात १०० गडकिल्ल्यांना भेटी : १९९० साली हमिदा यांनी युथ हॉस्टेल सोबत त्यांचा ट्रेकिंगचा प्रवास सुरु केला. शाळेत असल्यापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना कुतूहल होतं आणि म्हणूनच त्यांनी गड- किल्ले भटकंतीला सुरुवात केली. पण त्यांच्या या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती १९९९ साली. कारण तेव्हाच त्यांना गड- किल्ल्यांची माहिती गोळा करण्याचा ध्यास लागला. १९९९ साली त्यांच्या या प्रवासाला कलाटणी देण्याचे मुख्य कारण म्हणजे या एका वर्षात त्यांनी एकूण १०० गड किल्ल्यांना भेट देत त्या किल्ल्यांच्या माहितीचे संकलन केले. त्यांनी संकलित केलेल्या माहितीमध्ये गडाच्या इतिहासाबरोबरच गडाचे फोटो, तिथे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक व गडावरील वास्तूंची नोंद अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.१९९९ नंतर हमिदा यांनी गड- किल्ल्यांना भेट देण्याचा सपाटाच लावला. २००० साली तर त्यांनी चक्क १५० गड- किल्ल्यांना भेट दिली. २००१ साली आणखी शंभर गड- किल्ले त्यांनी सर केले. अशा रितीने अवघ्या ३ वर्षांमध्ये हमिदा यांनी महाराष्ट्रातील ३५० गड- किल्ले सर केले.
वाईट चांगले असे अनेक अनुभव : हमिदांच्या या २० वर्षातील गड- किल्ल्यांच्या प्रवासातील अनेक बरे वाईट अनुभव आहेत. त्यातील एक वाईट अनुभव त्यांना नळदुर्गला जात असताना रात्रीच्या वेळी तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत त्यांना मुक्कामासाठी राहू दिले नव्हते तेव्हा आला. महिलांना तुळजापूर मंदिरातील धर्मशाळेत राहण्याची परवानगी नाही असं सांगून त्यांना नकार देण्यात आला होता. अशा प्रसंगांसंदर्भात बोलताना हमिदा म्हणतात, ‘मुलींनी एकटा प्रवास करताना जरा काळजी बाळगावी. एखादं धाडस करताना निसर्गाची साथ मिळते पण काही वेळा माणूसच माणसाला साथ देत नाही हे लक्षात घ्यायला हवे.’ पुढे त्या म्हणतात की, मला
भटकंतीची आवड पूर्वीपासून होती आणि या भटकंती मधून हा ध्यास निर्माण झाला की महाराजांचे गड किल्ले आपण पहावे व त्याचा अभ्यास करावा. १९९० सालापासून मी भटकंती करत आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही रायगड किल्ला पाहिला व श्री अप्पा परब यांनी आम्हाला रायगड दाखवला व त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीतून आम्हाला त्याची आवड निर्माण झाली व या रायगड किल्ल्याच्या निमित्ताने किल्ले बघण्याचा व त्याचा अभ्यास करण्याचा ध्यास निर्माण झाला.