मुंबई : आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज आणखी एक वादग्रस्त कृत्य केले आहे. सदावर्तेंनी आज एका पत्रकार परिषदेत महापुरुषांच्या फोटोंसोबत नथुराम गोडसेचा देखील फोटो लावला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबत गोडसेचा फोटो लावला. त्यांच्या या कृत्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'नथुराम गोडसेंसोबत अन्याय झाला' : यावेळी बोलताना सदावर्ते यांनी नथुराम गोडसेसोबत अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, ' मी वकील होतो. मी संविधानाचा अभ्यासक आहे. मला सर्वांना सांगायचे आहे की, नथुराम गोडसेंसोबत फाशीची ट्रायल झाली होती. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना न्याय नाही मिळाला. नथुराम गोडसे पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायलचा सामना केला. हे माझं वैयक्तिक मत असून मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे', अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली.
शरद पवारांवर जहरी टीका : यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. ते म्हणाले की, 'शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उत्तर द्या. तुम्ही किती षंढ आहात हे आता तुम्हाला जनताच दाखवेल. औरंगजेबाचे प्रेम तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. शरद पवार हे वैचारिक व्हायरस आहेत. त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आम्ही राज्यभर बैठका आणि सभा घेऊ', असे ते म्हणाले.
' स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक लढवणार' : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को - ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनलही उतरले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक ही शरद पवारांची आर्थिक नाडी आहे. त्यांच्यामुळेच कष्टकऱ्यांना याचे एकदाही अध्यक्षपद मिळाले नाही. मात्र आता या निवडणुकीत आमचे पॅनल लढणार आणि विजयी होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :