मुंबई Guaranteed Price Of Paddy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत धान पिकाला किमान हमी भावापेक्षा जास्त भाव देण्याची घोषणा केली. मोदींची गॅरंटी या नावानं धानाला 3100 प्रति क्विंटल भाव दिला जाणार आहे. महाराष्ट्रातही मोदी सरकारची सत्ता आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही कापूस, सोयाबीनसह सर्वच पिकांना किमान हमी भावापेक्षा अधिक भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
एमएसपी पेक्षा ४० टक्के दर : देशात छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये 3100 रुपये प्रति क्विंटल धानाला हमीभाव जाहीर केला होता. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी देखील हमीभावाची मागणी केलीय. महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे. त्यामुळं कापूस, सोयाबीन पिकांसाठी 40% पेक्षा जास्त हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केलीय.
यंदा दुष्काळामुळं पिकांना फटका : 2022 मध्ये कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. सोयाबीनला 11 हजार 500 रुपये भाव होता. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना पावसाचा अधिक फटका बसला आहे. दोन्ही पिकांचं उत्पादन कमी झालं आहे. तसंच भावही कमी असल्यानं शेतकरी नाराज आहेत, असं शेतकरी नेते शिवाजी गायकवाड यांनी म्हटलं आहे.
उत्पादन घटलं : महाराष्ट्रात 2022 ला खरीप हंगामात सोयाबीनची लागवड 46 लाख हेक्टरवर झाली होती. यंदा राज्यात 24 लाख 23 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. राज्यात 40 तालुके दुष्काळी असल्यामुळं पीक उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळं एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल जास्त दरानं शासनानं भाव दिला पाहिजे, असं देखील शिवाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे.
सर्व पिकांना बोनस द्या : "छत्तीसगड मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी धान पिकाला 3100 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाची घोषणा केलीय. राज्यात देखील भाजपाचं सरकार आहे. कापूस, सोयाबीनचं उत्पादन यंदा घटलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही. त्यामुळं शासनानं कापूस पिकाला 9 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल तर सोयाबीन पिकाला 6 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करावा." असं शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -