मुंबई: राज्य सरकारचे सर्वात मोठे जे जे रुग्णालय आणि महाविद्यालय मुंबई भायखळा येथे आहे. या रुग्णालयाच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या परिसरात भुयार आढळून आले आहे. या भुयाराची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली. मात्र गेल्या काही महिन्यात त्यावर पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या भुयारांचे संशोधन करून जतन करण्यासाठी जे जे रुग्णालयाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणार निधीही रुग्णालयाकडून खर्च केला जाणार आहे.
रुग्णालयातील भुयारांकडे दुर्लक्ष: राज्य सरकाराच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात काही वर्षापूर्वी भुयार सापडले होते. त्याचप्रमाणे २०१६ मध्ये राजभवनमध्ये तसेच जे. जे. रुग्णालयातही ४ नोव्हेंबर २०२२ रोजी भुयार आढळून आले आहे. राजभवन मधील भुयाराचा विकास करून तातडीने करण्यात आला. त्याठिकाणी क्रांती गाथा हे दालन उभारण्यात आले आहे. मात्र, सेंट जॉर्ज आणि जे जे रुग्णालयात आढळून आलेल्या भुयाराकडे दुर्लक्ष झाले आहे. जे जे रुग्णालयात भुयार आढळून आल्यावर त्याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे. चार महिने झाले तरी या भुयाराकडे पाहण्यासाठी पुरातत्व विभागाला वेळ मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्व विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने तसेच निधीची कमतरता असल्याने दुर्लक्ष होत आहे.
भुयाराचे संशोधन: सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या १३० वर्षे जुन्या इमारतीत भुयार आढळून आले आहे. नर्सिंग कॉलेजचा भाग असलेल्या या इमारतीचे नाव डी. एम. पेटीट असे आहे. रुग्णालय परिसराची पाहणी करताना या इमारतीत झाकण आढळून आले. सुरक्षा रक्षकांना बोलावून त्याची पाहणी केली असता तेथे २०० मीटर लांबीचे भुयार असल्याचे समोर आले. भुयार आढळून आल्याची माहिती पुरातत्व विभाग, स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आले होते. या भुयाराचा अधिक शोध घेऊन ते जतन करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पुरातत्व विभागाला पत्र दिले आहे.
तर लवकरच यश येईल: १८९० च्या सुमारास ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे ते भुयार तितके प्राचीन असेल याची आम्हाला खात्री आहे. तसेच एक भुयार सेंट जॉर्ज रुग्णलयातही आहे. दोन्हीचा पाठपुरावा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुरातत्व विभागाकडे सुरु आहे. पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या संस्थेकडून या भुयाराचे सर्व्हेक्षण करून त्याचा इतिहास शोधला जाणार आहे. ते भुयार का बांधले, कशासाठी बांधले, ते कुठून कुठ पर्यंत जाते याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी आम्ही पुरातत्व विभागाकडून परवानगी घेत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्ही मार्गदर्शन घेत आहोत. यासाठी लागणार निधी जे जे रुग्णालयाकडून खर्च केला जाणार आहे. पुरातत्व विभागाने परवानगी दिल्यास लवकरच आम्हाला यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
राजभवनातील भुयारात क्रांती गाथा दालन: राज्याचे राज्यपाल राहत असलेल्या राजभवन परिसरात २०१६ मध्ये एका भिंतीच्या पलीकडे १५० मीटर लांब आणि १२ फूट उंचीचे भुयार आढळून आले. या भुयारात क्रांती गाथा हे दालन बनवण्यात आले आहे. या दालनात १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४६ सालच्या मुंबईमधील नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या जागविण्यात आल्या आहेत.