मुंबई Gram Panchayat Result २०२३: भाजपा हा अत्यंत खोटारडा पक्ष आहे. प्रत्येक वेळेला निवडणुकीत खोटी आकडेवारी जनतेसमोर सादर करून आपण नंबर वन असल्याचा सातत्याने दावा करत असतात. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. भाजपामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी जिंकलेल्या उमेदवारांची खरी यादी जाहीर करावी. पक्षीय चिन्हावर ज्या निवडणुका होत नाहीत, त्यांच्या उमेदवारांवर दावा सांगितला जातो, हा अत्यंत खोटारडेपणा आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
भाजपा खोटा पक्ष : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, असे असतानाही भाजपाने आपणच नंबर वन असल्याचा दावा करत सर्वाधिक जागा जिंकण्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आताही भाजपा खोटे दावे करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय.
भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे : महाविकास आघाडीला हजार पेक्षा अधिक जागा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 2320 जागांपैकी अनेक जागांचे निकाल हाती येत आहेत. यापैकी काँग्रेसच्या विचाराच्या 589 जागा जिंकलेल्या आहेत, तर 132 जागांवर स्थानिक पक्षांची आघाडी करून विजय संपादन केलेला आहे. म्हणजे काँग्रेसच्या खात्यावर 721 जागांची नोंद आहे, असा दावा पटोले यांनी केलाय. एकूणच राज्यात महाविकास आघाडीला 1312 जागांवर आतापर्यंत विजय मिळवलाय. मात्र, याबाबत काहीही न सांगता भाजपाच्या वतीनं खोटी आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचं पटोले म्हणाले.
भाजपाचा खोटा प्रचार : गडचिरोली, गोंदिया, नागपुरात भाजपाचा धुव्वा उडालाय. नागपुरात भाजपाचा सुपडा साफ झालाय. मात्र, तरीही भाजपा खोटी आकडेवारी देत आहे. मोहाडी तालुक्यात काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी आहे तर पवार गटाला सात जागा मिळाल्या आहेत. एवढा विजय संपादन केलेला असतानाही काँग्रेसला खातेही उघडता आले नाही, असा खोटा प्रचार भाजपाकडून केला जात असल्याचे नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात शांतता राखण्याची सरकारची जबाबदारी : भाजपानं राज्यातील ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी समाजाला 24 तासात आरक्षण आणून देतो, असा दावा फडणवीस यांनी केला होता मात्र, अद्यापही ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही. या निवडणुकीतही आरक्षण नव्हतं. भाजपानं ओबीसीवर अन्याय केला आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्याचसोबत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शांतता राखण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे, असेही पटोले यावेळी म्हणाले.
हेही वाचा -