मुंबई - सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त व माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुः ख व्यक्त केले आहे. नीला सत्यनारायण या एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील लेखिका, धीरोदात्त माता व चिंतनशील व्यक्ती होत्या. शासकीय सेवेतील तसेच जीवनातील प्रत्येक भूमिका त्या सकारात्मकतेने समरसून जगल्या. त्यांच्या निधनामुळे आपण एक उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तित्व गमावले आहे. नीला सत्यनारायण यांच्या निधनाचे दुः ख सहन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कुटुंबीयांना मिळो अशी प्रार्थना करतो असे, राज्यपालांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.
नीला सत्यनारायण या 1972च्या सनदी अधिकारी होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होण्याचाही मान मिळवला होता. सत्यनारायण यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिव म्हणून ही काम केले आहे. प्रशासकीय सेवेत तब्बल 37 वर्ष त्यांनी काम केले आहे. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. यासोबतच साहित्यिक म्हणूनही एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांची 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लेखक म्हणूनही ओळख असलेल्या सत्यनारायण यांच्या कवितांच्या ध्वनिचित्रफीती ही प्रकाशित आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.