मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनासाठी भाजपा धावून आली आहे. आता यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी मारली आहे. त्यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आणि अर्णब यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली.
राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली व रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून देखील चिंता व्यक्त केली होती.
काय आहे प्रकरण -
अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाही म्हणून अन्वय नाईक या आर्किटेकने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्या करताना अर्णब गोस्वामी यांचे नाव चिट्ठीमध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतरही अर्णब यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी व मुलीने केला होता. त्यानुसार सीआयडी चौकशी करून अर्णबला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अर्णब गोस्वामींची रवानगी तळोजा कारागृहात -
अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलविण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्याने जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार तुरुंग महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार तिघांनाही तळोजा कारागृहात हलविले आहे.
हेही वाचा- चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट; तर्कवितर्कांना उधाण
हेही वाचा- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण: तत्कालीन तपास अधिकारी सुरेश वराडे यांच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश