मुंबई - जलयुक्त शिवारातून मोठया प्रमाणात ग्राम परिवर्तन झाले, असे वक्तव्य राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी राज्यपाल बोलत होते. राज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केले.
यावेळी राज्यपालांनी सुरुवातील पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्याची ग्वाहीही दिली.
राज्यपाल यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आणि यांसारख्या इतर अनेक थोर नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांमुळे राज्याच्या जनतेची सेवा करण्यास शासनाला सतत प्रेरणा मिळते. महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबध्द आहे. दुग्धविकासात महाराष्ट्र राज्याची आघाडी आहे. मत्स्यव्यवसायात सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्याबरोबरच सरकारने सामाजिक न्यायाचा कार्यक्रम सक्षमपणे राबवला आहे. शासनाने रिक्त जागांची भरती केली. गृहनिर्माणच्या कामांतून गरीबांचा उद्धार केला. आरक्षणाची योग्य अंमलबाजावणी केली. तसेच यापुढे १०० टक्के विद्युतीकरणाचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.