मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाचे प्रकाशन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर हवा - राज्यपालांनी यावेळी भाषणात, पुस्तकाची प्रस्तावना सांगताना विविध पैलूंवर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या सगळे विद्यार्थी परिक्षेच्या तयारीत आहेत. तरीही वेळ काढून राजभवनात आलात. हे ठिकाण अभ्यास करण्यास स्फूर्ती देणारे आहे. येथील वातावरण बघून नवी उर्जा मिळते. पंतप्रधनांन भारत जगात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असायला हवा, यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रगतीच्या दृष्टीने नंबर एक - शस्त्रबळाने किंवा अन्य देशाच्या सीमा बळकावून नव्हे तर, प्रगतीच्या दृष्टीने भारत नंबर एकचा देश बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. ते एक प्रकारे वारियर्सचा काम करत आहेत. जसे सीमेवरील सैनिक लढाई जिंकून विजय मिळवतात, तेव्हा जेवढा आनंद होतो तसा, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केल्यावर आनंद होतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी शालेय मुलांची तुलना सीमेवरील जवानांशी केली आहे. परीक्षेत विद्यार्थी देखील वारियर्सच्या भूमिकेत असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी पुस्तकात केल्याचे राज्यपाल म्हणाले.
डर गया ओ मर गया - कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर, भयमुक्त व्हायला हवे. भयमुक्त झालात तर, उंच आकाशी झेप घेऊ शकता. पहिल्यांदा मनातून भीती काढून टाकायला हवी. मी मंत्री बनू शकतो का, मुख्यमंत्री होईन का, अशी भिती मनात ठेवल्यास प्रगती करु शकत नाहीत. डर गया ओ मर गया, असा फिल्मी डायलॉग मारत केसरकर यांना चिमटा काढला.
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख - पंतप्रधनांच्या पुस्तकात सरदार वल्लभ भाई पटेलांचे चरित्र दाखवण्यात आले आहे. सरदार पटेल यांनी सगळ्या राज्यांना एकत्र आणले होते. त्यांच्या स्मारकाचा उल्लेख पुस्तकात आहे. पटेल यांच्या स्मारक परिसर फिरल्याशिवाय कळणार नाही. महाराष्ट्रात तानाजीने कशी लढाई केली, हे पाहण्यासाठी गड किल्यांवर जावे लागेल. 'शिवाजीने गड आला सिंह गेला', असे का म्हटले, हे तेथे गेल्यावर कळेल, असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.
परीक्षेसाठी आतापासून तयारी करा - परीक्षा जवळ आल्यावर सगळेजण तयारीला लागतात. तसे न करता आतापासून प्रयत्न करा. पंतप्रधानांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच वारियर्स बनायला सांगत आहेत. कसलीही चिंता करु नका, भयमुक्त व्हा, त्यांचे हे पुस्तक वाचल्यास प्रेरणा मिळेल, असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.
मातृभाषेतील शिक्षणावर भर - दीपक केसकरकर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुस्तक दहा वर्षांपासूनच्या वरील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. मुलांचे भविष्य घडविण्यास मार्गदर्शक देखील आहे. जगात विविध भाषा बोलल्या जातात. परंतु, मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांना त्याचे पटकन आकलन होते. यंदापासून इंजिनिअरिंगची पुस्तके मराठी अनुवादीत असणार आहेत. मराठीची सक्ती असली तरी भाषेची अडचण येणार नाही. मातृभाषेतून शिक्षण देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.
पंतप्रधानांचे पुस्तक दीपस्तंभ - एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक त्याचाच भाग आहे. मनात कोणतीही भीती बाळगू नका, असे आवाहन पु्स्तकातून केले आहे. लवकरच प्रत्येक शाळेत हे पुस्तक वितरीत केले जाईल. उत्कृष्ट शिक्षण देण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे पुस्तक दीपस्तंभ देण्याचे काम करेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले.