मुंबई - नांदेड येथील मठाधिपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी रात्री २ च्या सुमारास हल्ला केला. त्यात महाराज व एक सेवेकरी यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांकडून करण्यात आली. दरम्यान, भाजप नेत्यांनी या घटनेबाबत तीव्र शब्दांत दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
मंदिर आणि साधूसंतांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. हे पालघर आणि या नांदेडमधील घटनेतून अधोरेखित होते. अधर्मी शक्तींचे प्राबल्य वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट सरकारने ताबडतोब साधूसंतांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. साधूसंतांच्या संरक्षणार्थ एक कठोर कायदा तयार करावा. कोणत्याही परिस्थितीत संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधूसंतांची हत्या होते हा डाग आपल्यावर लागता कामा नये. त्यामुळे धर्मारक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या साधूसंतांचे महाराष्ट्र सरकारने संरक्षण करावे, असे भाजपच्या वतीने म्हटले आहे.