मुंबई - राज्यात विविध प्रश्न आहेत, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे विरोधक कोंडीत पडकणार, या भीतीने सत्ताधारी पक्षाकडून कोविडच्या नावाखाली अधिवेशन गुंडाळण्यात येत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधीमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता; पालिका २४ नवीन कोरोना सेंटर सुरू करणार
आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत अधिवेशन पूर्ण कालावधीत चालावे, अशी विरोधकांनी मागणी केली. मात्र, पूर्णतः कामकाज करायचेच नाही, अशी मानसिकता घेऊनच सरकार चर्चेला आले होते. त्यामुळे, पूर्ण अधिवेशन घ्यायचे नसेल तर लेखानुदान घ्या, अशीही सूचना केली. सरकार ती ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे सल्लागार समितीच्या बैठकीतून बहिर्गमन करण्याचाच पर्याय उरल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिवेशनात अर्थसंकल्पावर खातेनिहाय चर्चा अपेक्षित असते. विनियोजन विधेयकानंतरच अर्थसंकल्प पारित होतो. खातेनिहाय चर्चा झाली, तर प्रत्येक खात्यातील भ्रष्टाचार बाहेर येईल, या भीतीने अधिवेशनच मर्यादित घ्यायचे, हा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नियम फक्त विरोधकांनाच
कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या, अशीही मागणी भाजपने केली आहे. पण, कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. येथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. हा प्रकार म्हणजे पूर्णपणे अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचे नाटक सुरू आहे. मात्र, विरोधक संजय राठोड प्रकरण असो की, वीज कापण्याचे असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत चर्चा नाही
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. अनेक मंत्री आणि अमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते अधिवेशनाला हजर राहू शकणार नाहीत. त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे, अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडू शकते. तशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, असे असले, तरी आगामी पावसाळी अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड केली जाऊ शकते, तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणे म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरणे होय. निवडणुकीत काही वेगळे चित्र निर्माण होईल का? अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
हेही वाचा - महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या