मुंबई - वैद्यकीय सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. 'कोरोना'च्या संकटकाळातही अर्धांगवायू, दमा, हृदयविकार व अन्य दुर्धर व्याधींनी रुग्ण त्रस्त आहेत. अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयांनी व्यवहार्य यंत्रणा तयार कारावी, यासाठी राज्याचे प्रधान सचिव अजोय मेहता यांच्याशी आपण चर्चा केली असून याबात नवीन शासन आदेश काढण्यात आला असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णांना दाखल करून घेण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. याबाबत शहरातील सजग नागरिकांच्या शिष्टमंडळाने शहराचे पालकमंत्री शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वैद्यकीय तपासणी व उपचारांपासून वंचित राहू नये, अशी व्यवहार्य यंत्रणा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश रुग्णालयांना शासन आदेशात देण्यात आलेले आहेत. तसेच, 'कोरोना' मृतकांच्या शवांना ३० मिनिटांच्या आत प्रभागातून हलवण्याचे व १२ तासांच्या आत शवाची विल्हेवाट लावण्याचे निर्देशही शासन आदेशात देण्यात आले आहे. त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना या शासन आदेशाचा नक्कीच फायदा होईल, अशी माहिती शेख यांनी दिली आहे.
हेही वाचा- धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये आरेतील झाडांची कत्तल, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल