मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मनसेने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक (Meeting of Shiv Sena leaders) घेण्यात आली. बैठकीत, उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला सडेतोड उत्तरे देण्याचा आदेश दिला आहे. बैठकीत बाबरी मशिद, तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 'बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते. मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचे काय सुरु होते. भाजपवर तुटुन पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचे हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. तसेच शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.खासदार संजय राऊत, अरविंद बी. सावंत, आमदार नीलम गोरे, प्रियंका चतुर्वेदी, सचिन आहेर, सुनील प्रभू, किशोरीताई पेडणेकर, शीतल म्हात्रे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंदराव दुबे, किशोर तिवारी, हर्षल प्रधान, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, अनिल देसाई, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, धर्यशील माने, संजय मंडलिक, भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे नेते बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आता मिशन मराठवाडा वर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती दिली. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 मेला औरंगाबाद मधेल सभा घेणार आहेत. लवकरच शिवसेनेकडून मराठवाड्यात शिव संपर्क अभियान सुरू करणार असून, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र येथेही शिव संपर्क अभियान राबवले जाणार आहे. अशी माहितीही राऊत यांनी दिली.
शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केले हे संपूर्ण देशाला माहित आहे. विरोधकांचा हिंदुत्वाशी काय संबंध? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना विचारला. हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी सहा वर्ष आपला मतदानाचा हक्क गमावला. मात्र हिंदुत्वासाठी विरोधकांकडून रक्त सोडा घामाचे दोन थेंबही कधी जमिनीवर पडले नाहीत असा टोला राऊत यांनी लगावला. मुंबईत झालेल्या 1992 च्या दंगलीत अनेक शिवसैनिकांनी आपले प्राण गमावले. मात्र आता मराठी मते फोडण्यासाठी हिंदू ओवेसीला पुढे केले जाते असा टोला राज ठाकरे यांचं नाव न त्यांनी लगावला आहे.