मुंबई - मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यास येणाऱ्या जखमी व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून त्यांना रुग्णालयात दाखल करा. असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. या अगोदर एखाद्या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला जर पोलीस स्टेशनला जावे लागले असेल तर त्या संदर्भातील गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सर्वप्रथम त्यास सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार करून तशा प्रकारचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र यात बदल करत जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेने पोलिसांनी स्वतः नेऊन रुग्णालयात उपचार करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
सूचनांचे पालन न केल्यास होणार विभागीय चौकशी -
मुंबई पोलीस खात्यातील ९४ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशी केली जाईल असेही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या सोबत मुंबई पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यां सोबत झालेल्या एका बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली होती. 2019 मध्ये चेंबूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जखमी झालेल्या व्यक्तीला गुन्हा दाखल करत असताना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. पण मात्र या दरम्यान त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला होता. त्यानंतर मुंबई पोलीस खात्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा - कोविड जागरुकतेसाठी मुंबई पोलीस मार्मिकतेने वापरताहेत फिल्मस्टार्सची नावे!