मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मुलीने विधानसभा निवडणुकीसाठी भायखळा मतदार संघामधून उमेदवारी अर्ज भरला आहे. अखिल भारतीय सेनेकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या गीता गवळी यांनी आपण विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी नगरसेविका आहेत. महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असताना गवळी यांनी महिला व बालविकास समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. भायखळा मतदार संघामधून भाजपकडून गीता गवळी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळाली. यामुळे गीता गवळी यांनी अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या अमीन पटेल यांच्या विरोधात माजी पोलीस अधिकारी निवडणूक रिंगणात
भायखळा मतदार संघातून एमआयएमचे वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे रईस शेख, शिवसेनेच्या यामिनी जाधव हे निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांना आपण एकसमान मानत असून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याचे गवळी यांनी संगितले.
अर्ज भरायला अडीच तासापेक्षा जास्त वेळ -
भायखळा निवडणूक कार्यालयात पहिलाच उमेदवारी अर्ज भरणाऱ्या गीता गवळी यांना अर्ज भरण्यासाठी अडीच तासापेक्षा जास्त वेळ लागला. अर्ज भरण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने गवळी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली होती. मी उमेदवारी अर्ज भरणारी पहिलीच उमेदवार होते. अर्ज तपासणी आणि अर्ज भरण्याच्या नियमात झालेल्या बदलांमुळे अर्ज भरण्यास वेळ लागल्याचे, गवळी यांनी संगितले.