मुंबई - पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबत असल्याने या पाण्याचा निचरा करण्यासाठी आठ पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यापैकी २०१४ मध्ये विलेपार्ले येथे गझदरबंध पंपिंग स्टेशन बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, कंत्राटदाराने उशीर केल्याने काम रखडले. अखेर पालिकेला कंत्राटदार बदलून पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण करून घ्यावे लागले आहे. पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्याने येत्या पावसाळ्यात जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ या परिसरातील पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.
मुंबईतील सखल भागात थोड्या पावसानंतरही पाणी तुंबण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी पर्याय म्हणून पालिकेने पंपिंग स्टेशन बांधण्याचे काम हाती घेतले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा पंपिग स्टेशनमार्फत केला जातो. आठ पंपिंग स्टेशनपैकी आतापर्यंत पाच पंपिंग स्टेशन सुरु झाली आहेत. विलेपार्लेतील सहावे गझदरबंध पंपिंग स्टेशनच्या कामाला २०१४ साली सुरुवात झाली. हे काम २०१६ साली पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, तीन वर्ष काम रखडले. कंत्राटदाराला ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली. मात्र, कंपनीला निधी अभावी कर्ज मिळविण्यात अडचणी निर्णाण झाल्याने काम रखडले होते. मुदतीत काम न झाल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड ठोठावला. गझदरबंध पंपिंग स्टेशन ३१ मे पर्यंत कार्यान्वित केले जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले होते. त्यानंतर पावसाच्या पार्श्वभूमीवर ९ जूनची डेडलाईनही दिली. मात्र, यावेळीही गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे काम काढून घेऊन दुसऱ्या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली. काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. दरम्यान, तीन वर्ष रखडलेले हे काम आता पूर्ण झाले असून येत्या पावसांत कार्यान्वित केले जाणार आहे. या पंपिंग स्टेशनच्या कामाला १२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
आचारसंहितेमुळे सोशल मिडीयावरून माहिती -
गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पश्चिम उपनगरात साचणारे पावसाचे पाणी समुद्रात सोडणे सोपे जाणार आहे. पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्याची माहिती शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी फेसबुकवर पोस्टद्वारे दिली आहे. आचारसंहितेमुळे पंपिंग स्टेशनचे उदघाटन न करताच सत्ताधाऱ्यांनी काम पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
कार्यान्वित झालेले पंपिंग स्टेशन्स - खर्च
हाजी अली पंपिंग स्टेशन : १०० कोटी
इर्ला पंपिंग स्टेशन : ९० कोटी
लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन : १०२ कोटी
क्लिव्हलँड बंदर पंपिंग स्टेशन : ११६ कोटी
ब्रिटानिया पंपिंग स्टेशन : १२० कोटी
गझदर पंपिंग स्टेशन : १२५ कोटी