मुंबई - गणरायाच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी गौरी घरी येते. घरोघरी गौरीच्या स्थापनेकरिता महिला वर्गात मोठा उत्साह आणि आनंद दिसून येतो. अशात आज गौरी विसर्जनासोबत सहा दिवसाच्या गणरायाचेही विसर्जन केले जात आहे. गौरी-गणपतीच्या विसर्जनाकरिता भांडुपच्या शिवाजी तलावावरही भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.
गौरीचे पहिल्या दिवशी घरी आगमन होते. यानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. यावेळी गौरीची सजावट केली जाते. यासोबतच छोट्या मंडपात 16 भाज्या 16 विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे फुले समोर ठेवून आकर्षक विद्यूत रोषणाई केली जाते. तिसरा दिवस गौरीच्या विसर्जनाचा असतो. यानंतर भक्तिभावाने गौरींचे व गणरायाचे विसर्जन केले जाते .
भांडुप पश्चिम येथील शिवाजी तलावावर टेभीपाडा, सर्वोदयनगर ,गाढवनाका ,सह्याद्री नगर गावदेवी, तुलशेत पाडा, कोकणनगर, महाराष्ट्र नगर, आंबेडकर नगर येथील नागरिक गौरी व गणरायचे विसर्जन करतात. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी आज याठिकाणी मोठी गर्दी केली. यासोबतच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तिथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला.