मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'गंगूबाई कठियावाडी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईची भूमिका साकारत आहे. भूमिकेतील तिचा लूक देखील समोर आला होता. मात्र आता चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवले जाण्याची शक्यता आहे. गंगूबाईच्या कुटुंबाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.
चित्रपटावर आक्षेप
संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी 'गंगूबाई कठियावाडी' या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या 'गंगूबाई' यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात 22 डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
खटला दाखल
वकील नरेंद्र दुबे यांनी सांगितले आहे की, आम्ही आलिया भट्ट, हुसैन झैदी, संजय लीला भंसाळी, भंसाळी प्रोडक्शन, जेने बोरगेस यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.संजय लीला भंसाळी यांनी या चित्रपटात माझ्या अशीलाच्या आईबद्दल अतिशोक्ती आणि गुन्हेगारीशी संबंध नसताना तशी दृष्य दाखवली आहे, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी आम्ही केली आहे.
'माफिया क्वीन ऑफ मुंबई'
संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' पुस्तकातील गंगूबाई काठियावाडी यांच्यावर लिहिलेल्या एका भागावर आधारित आहे. हुसैन झैदी यांच्या पुस्तकातील एका भागावर हा चित्रपट आधारित आहे.गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मजूर मुलींसाठी काम केले आहे. यापूर्वी हा चित्रपट 11 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु सद्य परिस्थिती पाहता या वर्षी हा चित्रपट पूर्ण होण्याच्या शक्यता कमी आहेत. चौकटीबाहेरील, धाडसी भूमिका स्वीकारल्यामुळे आलियाचे चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
हेही वाचा - लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? नाताळसह नूतन वर्षाच्या स्वागताला येणाऱ्या पर्यटकांचा होणार हिरमोड
हेही वाचा - नवीन वर्षात बेशिस्त वाहन चालकांना लागणार शिस्त, नियम मोडणाऱ्यांना दंडासह खावी लागणार तुरुंगाची हवा