मुंबई : Ganesh Visarjan 2023 : मुंबईत जवळपास 35 हजारहून अधिक गणपतींचं विसर्जन झाल्याची माहिती पालिकेनं दिलीय. शुक्रवारी सकाळी समुद्राला ओहोटी आल्यानं गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाला उशीर झाला होता. त्यामुळं अनेक मोठ्या मूर्तींचं विसर्जन बाकी होतं. अखेर भरतीनंतर सर्व मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या आणि सकाळी दहा वाजेच्या दरम्यान गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी जुहू, दादर तसेच गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भाविकांचा जनसागर उसळला : पुढच्या वर्षी लवकर या...चैन पडे ना आम्हाला... अशी भावनिक साद घालत 'लालबागच्या राजा'ला (Lalbaugcha Raja 2023) भाविकांनी निरोप दिलाय. जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजानं दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला. सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात (Girgaon Chowpatty) विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांचा जनसागर उसळला होता. जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर राजाला निरोप देण्यात आला.
जवळपास 35 हजारहून अधिक गणपतींचं विसर्जन : मुंबईत जवळपास 35 हजारहून अधिक गणपतींचं विसर्जन झालंय. त्यात नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये 20 हजार 195 गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. यात सार्वजनिक मंडळांचे 1019, घरगुती 18772, गौरी 304 असा समावेश आहे. तर, कृत्रिम तलावांमध्ये आतापर्यंत दहा हजाररून अधिक गणपतींचे विसर्जन करण्यात आलंय.
वीज कोसळल्यानं एका स्वयंसेवकाचा मृत्यू : विसर्जना दरम्यान जुहूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. विसर्जनाच्या वेळी जुहू समुद्रकिनाऱ्यावर वीज कोसळली. यात एका 16 वर्षाच्या स्वयंसेवकाला जबर मार लागला. त्यानंतर त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांनी जुहू बीचवर लोकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले होते. ही एक घटना वगळता संपूर्ण महानगरात विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
22 तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू होती : मुंबईतील लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल 22 तासांपासून सुरू होती. मिरवणूक शुक्रवारी सकाळी गिरगाव चौपाटीजवळ दाखल झाली होती. मात्र, समुद्राला ओहोटी आल्यानं गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जनाच्या रांगेतच होत्या. अखेर सकाळी नऊच्या दरम्यान लालबागच्या राजाचा गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलंय.
हेही वाचा :