मुंबई - कालपासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली. आज ठिकठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे. मुंबई पूर्व उपनगरातील पवई तलाव, भांडूप शिवाजी तलावा अनेक कृत्रिम तलावांमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. विसर्जन तलावांच्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांच्या हस्तेच बाप्पाचे विसर्जन केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सवावर कडक निर्बंध लावले आहेत. विसर्जन स्थळी गर्दी होवू नये यासाठी महानगरपालिकेने विभागानुसार कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. 168 कृत्रिम तलाव आणि 7 ते 8 वाहनांवर फिरती विसर्जन केंद्र पालिकेने उपलब्ध करून दिली आहेत. जे नागरिक विसर्जनासाठी बाहेर पडू इच्छित नाहीत, अशांसाठी पालिकेतर्फे एक वाहन सुध्दा उपलब्ध करण्यात आले आहे. हे वाहन विभागानुसार फिरत बाप्पांच्या मूर्ती जमा करत आहे.
दरम्यान, वसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असून नागरिकांना गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याच बरोबर तलावावर अपघात घडू नये यासाठी लाईफ गार्डही तैनात करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.