- गोंदियाच्या आपणा गणेश मंडळाने राजस्थान येथील रंथनबोर गावातील पौराणिक गणपती मंदिराचा देखावा साकारला आहे. हे भव्य मंदिर पाहण्यासाठी मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील भाविकांनी देखील गर्दी केली आहे. सोबतच या वर्षी मंडळाचा १५ वा वर्ष असल्याने आपणा गणेश मंडळाने छत्तीसगढ राज्याच्या दुर्ग येथून १५ फूट उंच भव्य मूर्ती तयार करून आणली आहे .
- हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची चळवळ उभी राहिली आहे. यामध्ये जवळपास २ हजार झाडे लावली जात आहेत. या चळवळीच्या अनुषंगाने पर्यावरण विषयक संदेश देण्यासाठी, गणेशोत्सव काळात झाडाच्या मुळांना थोडाफार आकार देऊन झाडामध्ये गणपती साकारत वरुड चक्रपाणी येथील अष्टविनायक गणेश मंडळाकडून गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे.
- लातुरात भर दुष्काळातही गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. येथील सुवर्ण गणेश मंडळाकडून अन्नदानाची परंपरा यंदाही कायम आहे. पाणी टंचाईची लातूरकरांच्या मनात धास्ती आहे. सध्या लातूर शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. हीच अवस्था कायम राहिली तर दोन महिन्यांनी पुन्हा लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. मात्र, आहे त्या परिस्थितीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर आणि भविष्यातील उपाययोजनेबाबत येथील सुवर्ण गणेश मंडळात भाविक भक्तांनी संवाद साधला.
- नागपुरच्या टेकडी गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. टेकडी गणेश मंदिर हे नागपूरचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच पावसात देखील भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. बाप्पांची मूर्ती आणि मंदीर परिसराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.नागपूरच्या ग्रामदैवत असलेल्या गणेश टेकडी मंदिरात नागपूरसह जिल्ह्यालगत असलेल्या राज्यातून आणि इतर जिल्ह्यातील भाविक मोठी गर्दी करत आहेत.
- नाशिकच्या वाहतूक शाखेत विराजमान हेल्मेट बाप्पाची राज्याचे गृहराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरती केली. त्यावेळी नाशिकचे वाहतूक पोलीस हेल्मेट बाबत करत असलेल्या जनजागृतीचे गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले.