मुंबई - मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांमध्ये संशोधन वाढावे. तसेच, यामध्ये संशोधन कामाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठाने काही निर्णय घेतले आहेत. लघु संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य म्हणून, विद्यापीठ पहिल्या टप्प्यात एकूण मंजूर निधीच्या ७० टक्के निधी वितरीत करणार आहे. यामध्ये (२ कोटी ९४ लाख ५४ हजार) इतका निधी वितरीत केला जाणार आहे.
'११७९ लघु संशोधन प्रकल्पांसाठी हा निधी मंजूर'
संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठ दर वर्षी अनुदान स्वरूपातील निधी शिक्षकांना देत असते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे निधी मंजूर झाले नव्हते. त्यामुळे आता शैक्षणिक वर्ष (२०१९-२०)साठी विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षकांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी हा निधी मंजूर झाला आहे. १ हजार १७९ लघु संशोधन प्रकल्पांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मानव्यविद्या शाखेतील १७४, वाणिज्य २४५, विज्ञान ३९९ आणि अभियांत्रिकीसाठी ३६१ या प्रकल्पांचा समावेश आहे. उच्च शिक्षणात संशोधनाच्या वाढीसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधन चालना वाढावी. तसेच, संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी शिक्षकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
'शिक्षकांना धनादेशाद्वारे निधी देणार'
शैक्षणिक वर्ष (२०१९-२०)साठी विद्यापीठामार्फत शिक्षकांचे लघु संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी ॲानलाइन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात आले होते. विविध विद्याशाखांसाठी प्राप्त प्रस्तावांची समिती मार्फत छाननी करून (११७९)प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. यामधील संबधीत शिक्षकांना धनादेशाद्वारे निधी देण्यात येणार असल्याचे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.