मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत 2 हजार 686 पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 108 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या टेस्ट करण्याची मागणी केली जात होती. त्या प्रमाणे शुक्रवारपासून पालिकेने आरोग्य, स्वच्छता, मलनिःसारण यासह विविध खात्यातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच बंदोबस्तात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची देखील ‘रॅपिड अँटिजेन कीट’ द्वारे टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कोविड १९ अर्थात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. यामध्ये प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांसह संपूर्ण मुंबईभर असलेली विविध आरोग्य केंद्र, दवाखाने, आरोग्य स्वयंसेवक, इतर आजारांच्या प्रतिबंधासाठी राबणारे आरोग्य कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन खाते अंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचारी, झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालक संस्थांचे कार्यकर्ते, मलनिःसारण व तत्सम कामकाज करणारे कर्मचारी यांच्यासह विविध खात्यांचे कर्मचारी या सर्वांचा यामध्ये समावेश आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक कामकाजामध्ये सक्रिय सहभाग देणाऱ्या बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांची देखील चाचणी करण्यात येणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआर, केंद्र व राज्य सरकार आदींनी निश्चित करुन दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या चाचण्या केल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करुन तसेच सुरक्षित अंतर राखण्यासह सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन या चाचण्या घेतल्या जात आहेत.
पोलिसांचीही टेस्ट
मुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोरोना आरोग्य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्ताच्या कर्तव्यावर देखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची ‘रॅपिड अँटिजेन कीट’ द्वारे कोविड चाचणी केली जाणार आहे.