मुंबई : तक्रारदार रमेश कुमार शहा (वय एकाहत्तर वर्ष) हे चारकोपच्या एका खाजगी कंपनीत क्लर्क म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार 18 फेब्रुवारीला त्यांना रुला घनी नावाने एक ईमेल प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. भारतामध्ये गुंतवणूक करायची असून शहा यांनी हे काम हाताळावे, असे या ईमेलमध्ये सांगण्यात आले होते. रुला घनीने यासाठी पासपोर्ट कॉपी अलीकडचे फोटो तसेच 22 दशलक्ष यूएस डॉलरची पावती पाठवते, पैसे शहा यांच्या खात्यावर पाठवण्यात येतील. त्या बदल्यात पंचवीस टक्के रक्कम त्यांना देण्यात येईल, असे मेलमध्ये नमूद केले होते.
पाच लाख रुपयांची फसवणूक : अधिक पैशाच्या लोभापाई शहा यांनी ती ऑफर स्वीकारली. रुला घनीने त्यांना जकार्ता येथील कार्यकारी व्यवस्थापक अल्टो बेली हे संपर्क साधतील, असे सांगितले. त्यानंतर त्यांना 28 फेब्रुवारीला व्हॉट्सअप क्रमांकावरून फोन आला. त्यावेळी कॉलरने रुला घणीचा संदर्भ देत त्यांना परमाटा बँक जकार्ता येथे खाते उघडावे लागेल असे सांगितले. त्यासाठीची कागदपत्रे शहा यांनी पाठवत तीस हजार रुपये बेलीने पाठवलेल्या कॅनरा बँकच्या खात्यावर पाठवले. मात्र, पैसे बेलीला मिळाले नसल्याची बतावणी केली. शहा यांनी त्याला संपर्क केल्यानंतर कन्वर्जन चार्जेसच्या नावाखाली पाच लाख रुपये पाठवले.
पोलीस ठाण्यात सायबर गुन्हा : भारतातील सहकारी तुमच्या घरी येऊन 22 मिलियन डॉलर रोख स्वरूपात दिले जातील, असे सांगितल्याप्रमाणे 4 एप्रिलला निग्रो इसमाने काळ्या रंगाची बॅग शहा यांना दिली. ती बॅग उघडण्याआधी बेलीला तीन लाख वीस हजार रुपये पाठवायला सांगितले. शहा यांनी याबाबत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर बॅग उघडली. मात्र त्यात काळ्या कागदाच्या नोटांचे बंडल दिसले. त्यावेळी रमेश कुमार शहा यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : Mumbai Crime : हेव्ही डिपॉझिटच्या नावाने महिलेची साडेनऊ लाखाची फसवणूक; तिघांना अटक