मुंबई - एक्सटक डॉट कॉम या आरे कारशेडला विरोध करणाऱ्यामागे खोट्या संस्था कार्यरत आहेत. याद्वारे अशी विकासकामे ठप्प करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. खोट्या संस्थांनी परदेशातून अर्थसहाय्य घेत एका कंपनीला कंत्राट दिले. त्यानंतर या कंपनीने आरे कार शेडचे काम थांबवावे यासाठी ८२ हजार ई मेल केले. आरे कारशेडला विरोध करणाऱ्यामागे खोट्या संस्था (एनजीओ) काम करीत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
बोगस ई मेल तयार करत कारशेडच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ई मेल केल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी तयार केला आहे. या बोगस संस्थांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. काही दिवसातच याबाबतचा अहवाल तयार होईल. त्यामुळे आता राज्य सरकारचे पितळ उघडे होणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - जेएनयू हल्ला प्रकरण : आंदोलनकर्त्यांना गेट वे ऑफ इंडिया येथून हटवले
राज्यात सरकार आल्याबरोबरच मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईला चालना देणाऱ्या मेट्रो कारशेडला राज्य सरकारने स्थगिती दिली. त्यांना या कारशेडमध्ये गोंधळ घालायचा आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर त्यांनी कारशेडला कशा प्रकारे विरोध होत आहे याचा देखील खुलासा केला आहे. या कारशेडला विरोध करण्यासाठी एका कंपनीद्वारे एकाच तारखेला ८२ हजार ई मेल पाठवून मेट्रोच्या कामाला विरोध करण्यात आला आहे. काही व्यक्ती मुद्दाम हे करत आहेत. कारण त्यांना त्यामध्ये स्वतः फायदा साधायचा आहे. तसेच इतर जागेबद्दल नाव सुचवून खासगी जमीन धारकांना त्याचा फायदा करून द्यायचा आहे. यासाठी हे कोणीतरी राजकीय व्यक्ती करत आहे. म्हणून या कारशेडला विरोध होत आहे, असा अप्रत्यक्ष टोला पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी सरकारला लगावलेला आहे.
हेही वाचा - अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी
सर्व प्रकाराबाबत किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयटी सेल यांना देखील याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या देखील लक्षात आलेला आहे. ते लवकरच याविषयी अहवाल सादर करतील, असे त्यांनी सांगितले.