मुंबई - दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जाते. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात होतात. असाच एक अपघात रविवारी रात्री पंत नगर घाटकोपर येथे घडला. दारूच्या नशेत गाडी चालवताना चार वाहनांचे नुकसान करून पळ काढणाऱ्या दोघांना पंत नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - वंचितकडे वळलेला वर्ग आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करा - शरद पवार
रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पंत नगर घाटकोपर पूर्व नायडू कॉलनी येथे संत खेतेश्वर मार्गावर पार्किंग केलेल्या 3 चारचाकी व एका दुचाकी वाहनाला एका एंडिव्होर (क्रमांक MH 43 A 3396 ) या चार चाकी वाहनाने धडक दिली. चार वाहनांना धडक दिल्यावर या वाहन चालकाने पळ काढला मात्र याच रस्त्यावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना हा प्रकार नागरिकांनी सांगितला. त्यानंतर, पोलिसांनी अपघात करून पळून गेलेल्या वाहन चालकाला पाठलाग करून पकडले. सदर चालक व त्याचा सोबती दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्यांना पकडून पंत नगर पोलीस ठाण्यात नेले. संबंधिक चालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात MH 03 AZ 7758, MH 03 BS 5832, MH 43 AT 1605 या तीन चार चाकी तर MH 03 AQ 4235 या दुचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.