मुंबई - शहरात होळी शांततेत साजरी झाली. मात्र होळीचा आनंद घेत असताना ४२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रंगामुळे इजा झालेले तसेच डीजे लावल्याने भिंत कोसळून किरकोळ जखमी झालेल्या ४२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रंगामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या कमी आहे.
जखमींपैकी केईएम रुग्णालयात २७, जी. टी रुग्णालयात १२ तर जे. जे रुग्णालयात ३ जणांना दाखल करण्यात आले होते. या सर्वांवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी कार्यालये, महाविद्यालये सुटल्यावर धुलिवंदन खेळण्यास सुरुवात झाली होती. रात्री होळी दहनानंतर त्यात वाढ होत गेली. गुरुवारी सकाळपासून मुंबईत धुलिवंदनाचा रंग चढू लागला होता. रहिवासी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन रंगपंचमी खेळत होते. रासायनिक रंग वापरू नका असे सरकारकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनाला मुंबईकरांनी साथ दिली.
मात्र केईएम रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ६. ३० पर्यंत धुलिवंदन साजरी करताना २७ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी २१ जण किरकोळ जखमी झाले होते. डीजे लावल्याने भिंत कोसळून हे २१ जण किरकोळ जखमी झाले होते. भांग पिलेल्या ४ जणांना, रंगामुळे जळजळ झालेल्या एकाला तर रंगामुळे त्वचेला इजा झालेल्या एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.