मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी मदतीचा हात दिला आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. इतर मंडळे धुमधडाक्यात बाप्पाचे आगमन करत असताना मुंबईतील प्रसिद्ध फोर्टच्या राजा मंडळाने मात्र आगमनासाठी ढोल ताशा न वापरता हा पैसा पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राज्यात पूरपरिस्थिती भीषण असताना वाजतगाजत मूर्ती आणणे तत्वाला धरून नाही, असे फोर्टच्या राजा मंडळाने स्पष्ट केले आहे.
नुकताच चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’ चा आगमन सोहळा पार पडला. यंदाही भाविकांची या आगमन सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती.
मुंबईच्या मानाच्या गणेश मंडळांपैकी ‘फोर्टचा राजा’चे आगमन १८ ऑगस्टला होणार आहे. पण, यंदाचे आगमन मंडळाने शांतमय वातावरणात करण्याचे ठरवले आहे. मंडळाचा हा निर्णय म्हणजे संकटग्रस्त बांधवांना आर्थिक आणि भावनिक सहकार्य करण्यासाठी घेतला आहे. यात ज्या निधीची बचत होईल तो निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’च्या माध्यमातून पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे. यासाठी मंडळ संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कुठेही गाजावाजा करणार नाही. फक्त एक टेम्पो व त्यावर मदत करण्याचे आवाहन करणारं पोस्टर, अशाप्रकारे ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. मदत तळागाळातील नागरिकांपर्यत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत, सोबतच इतर मंडळांना आवाहन केलं आहे, की यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना फार गाजावाजा न करता होणाऱ्या खर्चाची बचत करून ती गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे फोर्टचा राजा मंडळाचे सचिव नयन डुंबरे यांनी सांगितले.