मुंबई - 'शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. रावले यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी मुंबईत आणले जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर परळच्या शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मोहन रावले हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचा कडवट शिवसैनिक म्हणून मोहन रावले परिचीत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय समजले जायचे. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. रावले यांचा दांडगा जनसंपर्क होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
“मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी ट्विटरवर रावले याना श्रद्धांजली वाहिली आहे.