मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेले माजी आमदार रमेश कदम यांच्यावर पाच जिल्ह्यांमध्ये विविध स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या 312 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्या संदर्भातील हे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. त्यांना या पाचही जिल्ह्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी जामीन मिळावा म्हणून मुंबई सत्र न्यायालयाकडे काही महिन्यांपासून अर्ज दाखल केला होता. त्या दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बीड, हिंगोली, परभणी, जालना आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यामध्ये त्यांच्या संदर्भात दाखल गुन्ह्यातील जामीन अर्ज अखेर मंजूर केला. त्यामुळे रमेश कदम यांना एक प्रकारे न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालेला आहे.
या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : महाराष्ट्र शासनाने 2012च्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना त्यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतर त्यांच्या संदर्भात आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण घडल्यानंतर सर्वांत आधी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर इतर पाच जिल्ह्यांमध्ये आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कदमांच्या वकिलांचा युक्तिवाद आला कामी : मागील आठ वर्षांपासून माजी आमदार राष्ट्रवादीशी संलग्न असलेले रमेश कदम हे ऑर्थर रोड तुरुंगामध्ये कैदेत आहेत. त्यांनी अनेकदा जामीन अर्ज केला होता. परंतु, त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. आज अखेर त्यावर सुनावणी झाली. रमेश कदम यांच्या वतीने वकिलांनी जोरदारपणे युक्तिवाद केला असता सत्र न्यायालयाने पाचही जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या संदर्भात रमेश कदम यांना अखेर जामीन मंजूर केला.
या वकिलांनी मांडली बाजू: राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या बाजूने आज न्यायालयामध्ये याचिकेच्या वतीने भक्कम बाजू मांडली. त्यामध्ये ज्येष्ठ वकील नितीन प्रधान, प्रकाश राऊळ, शुभ दाखवत, संजीव कदम यांनी बाजू मांडली. तर शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी शासनाची बाजू न्यायालयात मांडली.