मुंबई - मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देखमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणारी आणि सिंग यांच्या बदली निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका आहे.
काय म्हटलयं याचिकेत ?
याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच याचिकेमध्ये अनिल देशमुखांची सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
गृह खात्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितले असते, तर त्या संदर्भातील पुरावा राहिला नसता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. लेखी पुरावा म्हणून मी पत्र लिहिले आहे. मेल केलेला होता. मात्र, त्यावर सही केली नव्हती, असेही सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर चौकशीला हजर होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय करावा, असे वाटत असल्याचे व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले होते. त्यावेळेस परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर येत आहे.
अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणानंतर झाली होती उचलबांगडी -
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता. तपासादरम्यान स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा संशायस्पद मृत्यू झाला. हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेची या प्रकरणामध्ये एन्ट्री झाली. तपास अधिकारी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचा आरोप झाला. सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले तर, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती.
हेही वाचा - रियाजुद्दीन काझीने नष्ट केले पुरावे? बघा सीसीटीव्ही व्हिडिओ