मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जगभरातील ३३ देशांनी शिवसेनेतील बंडाची दखल घेतल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मांडत आहेत. विदेशातील अनेक महनीय व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी येत आहेत. अशातच श्रीलंकेचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीलंका टीमचा कॅप्टन अर्जुन रणतुंगा म्हणाले, की अनेक दिवसांपासून भेटीला यायचे ठरवले होते. त्यानुसार आज भेट घेतली. श्रीलंका अडचणीत असताना भारताने खूप मदत केली. त्याबद्दल खूप आभारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना श्रीलंकेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री शिंदे देखील श्रीलंकेत यायला इच्छुक आहे, असे रणतुंगा यांनी सांगितले. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी, श्रीलंकेतील कोलंबोला येथील आठवणींना उजाळा दिला.
दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे-सरनाईक म्हणाले, रामसेतूचे दगड आणि अवशेष बघितले. त्यामुळे राममंदिर निर्माणनंतर रामसेतू निर्माण व्हावे, अशी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेतील संस्कृती आपल्या भारतासारखी आहे. त्याठिकाणचे लोक भारतीय दाक्षिणात्य भाषा बोलतात. रामसेतू बांधण्यात आल्यास दोन्ही देश जवळ येतील. त्यांच्यातील संबध सुधारतील-प्रताप सरनाईक
रणतुंगा यांचा आहे हा व्यवसाय- अर्जुन रणतुंगा यांची इलेक्ट्रिक वन लंका प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांची किरकोळ विक्री करते. या संदर्भात रणतुंगा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्राने सांगितले. लवकरच याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय चर्चेला घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी रणतुंगा यांना दिले. रणतुंगा यांनी यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे
हेही वाचा-