मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची रवानगी आता केंद्रामध्ये होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, शिवसंग्राम पक्षाच्या १८ व्या वर्धापन दिनी बोलताना देवेंद्र फडणीस यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मी मैदान सोडणाऱ्यांपैकी नसून हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचेही ते म्हणाले.
मराठा समाजाची लढाई अजून संपलेली नाही. त्याकडे या सरकारचे लक्ष नाही. कोपर्डी प्रकरणी हे सरकार गंभीर नसल्याने आपल्याला आता याबाबत दबाव निर्माण करावा लागेल. मराठा समाजाचे आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही मागणी शिवसंग्रामची होती, त्यांना सत्तेत वाटेकरी करताना काही अडचणी आल्या. मात्र, शिवसंग्रामच्या महत्त्वाच्या दोन मागण्या आम्ही मान्य केल्या.
हेही वाचा - शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल
आता पुन्हा भाजप मित्रपक्ष शिवसंग्राम युतीचे सरकार येत नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जात नाही. मला अनेकजण विचारत होते तुम्ही दिल्लीला जाणार का? मी मैदान सोडून जाणारा नाही. कर्जमाफीमध्ये नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार? हे स्पष्ट नाही. या सरकारने भरपूर अटी घातल्या आहेत. या सरकारने एक काम प्रामाणिकपणे केले, ते म्हणजे जी कामे चालू होती त्यांना स्थगिती देणे. हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला
संघर्ष करून वर आलो आहोत, रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लोक आम्ही आहोत, आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला, तर याद राखा. आम्ही कोणतेही गैरवर्तन केले नाही. बदल्याच्या भावनेने काम केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांना चांगली वागणूक दिली, त्यांची कामेही आम्ही केली, कधीही त्यांना अपमानित करायचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आम्ही केले नाही. सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका, तो खाली आणल्याशिवाय जनता राहणार नाही, असेही फडवणीस म्हणाले.
हेही वाचा - प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन