मुंबई - कोरोनामुळे आपण सारे ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती अनुभवत असलो तरी येणार्या काळात भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. एकजूट आणि सकारात्मकता हे त्यात महत्त्वाची भूमिका वठवतील, असेही ते म्हणाले.
भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने ‘लॉकडाऊन पश्चात संधी आणि आव्हाने’ या विषयावर एक चर्चात्मक संवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात सहभागींच्या प्रश्नांनासुद्धा त्यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेती हे सर्वाधिक रोजगारनिर्मितीचे क्षेत्र आहे. त्यामुळे हे क्षेत्र आपल्या प्राधान्यक्रमात असले पाहिजे. आज कापूस, सोयाबीन, तूर हे शेतकर्यांच्या घरात पडून आहे. त्याची खरेदी सुरू झालेली नाही. योग्यवेळी खरेदी झाली नाही, तर त्यामुळे शेतकर्यांची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. त्यामुळे ही खरेदी त्वरित करून येणारा खरीपाचा हंगाम सुरळीत होईल, शेतकर्यांना आवश्यक कर्ज मिळेल, या सार्या बाबी सुनिश्चित कराव्या लागतील.
दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. एकतर आपल्याला भविष्याकडे सकारात्मकतेने पहावे लागेल आणि हातात हात घालून काम करावे लागेल. जागतिक मंदीतसुद्धा भारताची अर्थव्यवस्था मोठी झेप घेत असताना कोरोनामुळे निश्चितपणे थोडा ब्रेक लागला आहे. पण, चित्र निराशावादी नाही. यापूर्वी 5.5 टक्क्यांनी आपली अर्थव्यवस्था विकसित होईल, असा अंदाज होता. एक समाधानाची बाब आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर उणे राहणार नाही, असाच अंदाज व्यक्त केला जातो आहे. भारताकडे असलेले मोठे परकीय चलन, अन्नाचे विपुल भांडार आणि रिझर्व्ह बँकेसारखी शीर्षस्थ संस्था, भारताचा उत्पादनाचे हब म्हणून गतीने होत असलेला विकास या अतिशय जमेच्या बाजू आहेत. येणाऱ्या काळात बांधकाम, पर्यटन आणि सेवा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे राज्यांना मदत करणारे भक्कम नेतृत्त्व असल्याने, विविध राज्यांनी राजकारण न करता हातात हात घालून एका दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यास यातून आपण लवकर बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनानंतरच्या युगात जागतिक पातळीवर ट्रेड बॅरियर्स उभे राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर देऊन भारतीय उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ व्यापली जाईल. त्यातून मागणी आणि उपयोगीता वाढेल. अशात लघु व मध्यम उद्योगांकडेसुद्धा अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यांना चलन पुरवठा करावा लागेल. यात राष्ट्र प्रथम, स्वदेशी आणि स्वावलंबन ही त्रिसूत्री निश्चितपणे उपयोगी ठरेल, असेही ते म्हणाले. बदललेली परिस्थिती ही स्टार्टअपसाठी नेहमीच फायद्याची असते. कोरोनापूर्व आणि कोरोनापश्चात काळ हे दोन स्वतंत्र विश्व असतील. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपला आगामी काळ अतिशय चांगल्या संधी देणारा असणार आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीस जे म्हणाले ते या त्यांचा फेसबुक पेजवर आहे -
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/278825956468049/?flite=scwspnss&extid=BJUw25rgzp4hP2KRBody