मुंबई - राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर त्याच्या दुप्पट १५ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३ टक्के इतका झाला आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनामुळे एकूण ४० हजार ७०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के इतका आहे.