मुंबई - मेट्रो १ मध्ये खाद्यपदार्थ आणि पेय यांचे सेवन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई मेट्रो १ मध्ये बहुतांश प्रवासी या नियमाचे पालन करतात. मात्र, काही प्रवासी या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. प्रवाशांसाठी फूडस्टॉल्स उपलब्ध असून, या फूडस्टॉलवरच आपले खाद्यपदार्थ संपवून प्रवाशांनी ट्रेनमध्ये प्रवेश करावा असे आवाहन मेट्रो १ ने केले आहे.
मेट्रो १ च्या प्रवाशांनी मेट्रोमध्ये खाद्यपदार्थ किंवा पेय सेवन करू नये. यासाठी घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्गावर१३ मार्चपर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत ट्रेनमध्ये श्राव्य घोषणा (ऑडिओ अनाउन्समेंट्स), सर्व फूडस्टॉल्स आणि स्टेशनवर पोस्टर्स, फलकांद्वारे संदेश देण्यात येत आहे. या शिवाय स्थानकावर डिजिटल स्क्रीन्स आणि मेट्रोमध्ये एलसीडी स्क्रीन्सही लावण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो सुरू झाल्यापासून प्रवाशांनी नेहमीच शिस्त पाळली आहे, आणि त्यांनी कायमच सहकार्यही दिले आहे. त्यामुळे जे प्रवासी मुंबई मेट्रो १च्या सूचना-नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जात आहे.
मेट्रो कायद्यानुसार ट्रेनमध्ये खाणे किंवा पिणे हे नियमाचे उल्लंघन ठरते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱया प्रवाशावर मेट्रो कायद्यानुसार दंडनीय कारवाई केली जाईल. त्यानुसार ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असे मेट्रो १ मुबंई तर्फे स्पष्ट करण्यात आले.