मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यामध्ये भाजपला बुधवारी सायंकाळी ५ वाजता सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच उद्या होणारी सर्व प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे म्हणाले.
शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवारांनी राज्यपालांकडे सादर केलेले कागदपत्र चुकीचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. तसेच भाजपचा शपथविधी देखील कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच भाजपला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बहुमत चाचणीवेळी थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामध्ये गुप्त मतदान करण्यावर देखील बंदी घातलेली आहे. त्यामुळे उद्या होणार सर्व प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याचे श्रीहरी अणे म्हणाले.