मुंबई- पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ३६ तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील पूरग्रस्तांना वेळेवर मदत पोहोचली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पूर्व विदर्भातली पुराची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मुळात मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. राजीव सागरमधून पाणी सोडल्यानंतर ३६ तासांनी ते पाणी विदर्भात पोहोचते. या ३६ तासात अलर्ट देऊन लोकांचे नुकसान टाळता आले असते. भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ ५ हजार कुटुंब अस्ताव्यस्त झालेच नसते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, नदी काठावरील वास्तव्यास असणाऱ्या सर्वांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. ही परिस्थिती संपूर्ण विदर्भामध्ये आहे. यामुळे शेतीची देखील संपूर्ण वाट लागली आहे. त्यामुळे, सरकारने आता लवकरात लवकर नागरिकांच्या स्थलांतरासाठी एनडीआरएफचे पथक पोहोचवावे. एनडीआरएफचे पथक अगोदरच पोहोचायला हवे होते. पण आता प्रशासनाने काम सुरू केले आहे, तर आतातरी राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत. मदतीसंदर्भात स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देऊन मदत करावी, अशी राज्य सरकारकडे आम्ही मागणी करत आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- पालघर साधू हत्याकांड प्रकरणी एक पोलीस अधिकारी बडतर्फ, तर दोघांना सक्तीची सेवानिवृत्ती