मुंबई - पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडुप पोलीस ठाण्यात चक्क गुंडाचा वाढदिवस नुकताच साजरा केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी संबंधित पोलिसांची खातेनिहाय चौकशी दरम्यान भांडुप पोलीस ठाण्याच्या 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी सोनापूर भांडुप येथील रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवताना व गळाभेट घेत शुभेच्छा देतानाचे व्हिडिओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवले होते. पुढे तेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पोलिसांवर टीका सुरू झाली. आयन खान विरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेले नाही. उल्ला हा काही पोलिसांसाठी हप्ते गोळा करण्याचे काम करतो, अशी चर्चाही भांडुपमध्ये आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे, हेड कॉन्स्टेबल सुहास घोसाळकर, पोलीस नाईक अनिल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मारुती जुमडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडिओमुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यामार्फत आरोपीसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती.