मुंबई - मच्छीमार, कोळी समाजातील ५०० सुशिक्षित तरुणांना पोलिसात भरती करावे. तसेच त्यांना कमांडो आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी मच्छिमार कृती समितीद्वारे करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
भारतावर समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि कोकणच्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यांचे दहशतवादी हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणा धुळे आणि मुंबई पोलीसांना प्रशिक्षण देत आहे. याच पार्श्वूभूमीवर मच्छीमारांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करावी. त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.मुंबईच्या सुरक्षिततेसाठी मच्छिमारांच्या २४ हजार नौकांवर काम करणारे एक लाख मच्छिमार खलाशी तत्पर आहेत. ते नौदल कोस्टगार्ड व सागरी पोलिसांना सहकार्य करतील, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री व मुंबई पोलीस आयुक्तांना मच्छिमार कृती समितीने निवेदनाद्वारे दिले आहे, अशी माहिती तांडेल यांनी दिली.
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी मच्छीमारांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच लवकरच सर्व विभागाच्या सुरक्षेच्या यंत्रणेत मच्छिमार प्रतिनिधींना आमंत्रित करून यावर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मुंबई व कोकणातील मासेमारी नौकावर अद्याप चिप बसवले नसल्याचे दामोदर तांडेल व संजय बर्वे यांनी सांगितले. मुंबई व राज्यात सागरी पोलीस ठाण्यांचा अभाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
हायस्पीड गस्ती नौका भंगारात टाकण्यात आल्यामुळे मुंबई व कोकण किनाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे दामोदर तांडेल यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यात गस्ती नौका व सागरी पोलीस ठाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन प्रवीण परदेशी यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला दिले.