मुंबई - केंद्र सरकारने तिहेरी तलाकसंदर्भात कायदा आणल्यानंतर मुंबईत नागापाडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
पेशाने डायटेशियन असलेल्या यास्मिन (नाव बदललेले आहे) हिचा विवाह अहमदनगर येथे राहणाऱ्या वासिम (नाव बदलेले आहे) या तरुणाशी २००५ साली झाला होता. लग्न जमविताना नवरा मुलगा मोठा व्यवसाय करीत असल्याचे पीडित तक्रारदार मुलीच्या कुटुंबाला सांगितले होते. लग्न झाल्यानंतर मात्र पीडित महिलेचा पती हा बेरोजगार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे याबद्दल बरेच खटके नवरा-बायकोत उडाले होते.
तर २००९ मध्ये पीडित महिलेला जुळ्या मुली झाल्यावर आरोपी पतीने एका मुलीला स्वतःजवळ ठेवून घेतले होते. त्यानंतर २०१८ मध्ये पीडित महिलेला तिच्यापासून वेगळ्या राहणाऱ्या पतीने व्यवसाय करण्यासाठी पैसे मागितले. मात्र, पैसे देऊनही आरोपी पतीने कुठलाही व्यवसाय सुरु केला नव्हता. याबद्दल जाब विचारला असता सदरच्या पीडित महिलेला तिच्या पतीने तोंडी तिहेरी तलाक दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.