मुंबई - महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) विधीमंडळात सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प थोड्याच वेळात मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प विधानभवनात मांडण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्वरुपात राज्यात नवे समीकरण उदयाला आले आहे. त्यामुळे या पहिल्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अजित पवार यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत सादर केला. आर्थिक पाहणी अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकाला आला असून, कर्जाचा बोजाही वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्याची आर्थिक स्थिती खालावत असताना ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळतो का, हे पाहावं लागेल.
आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्रात प्रगती दिसत असली, तरी उद्योग क्षेत्रातील नैराश्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सामाजिक क्षेत्रही पुरेसे आशादायक नाही. महिला अत्याचारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यात आलेले अपयश आणि सामाजिक न्याय योजनांची अंमलबजावणी फोल ठरल्याने एकूणच सर्व स्तरांवर राज्याला आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.