नवी मुंबई - ऐरोलीत दोन गटामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. यातील एक जण भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही घटनास्थळी रबाळे पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार आहे.
ऐरोलीतल्या गरम मसाला हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. अमित मोघले विरोधात सागर जाधव आणि आदित्य क्षीरसागर या दोन्ही टोळ्यांचे गुंड गरम मसाला हॉटेलमध्ये होते. विरुद्ध गटाकडून अमित मोघलेच्या टोळीला खुन्नस दिली. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची होऊन एकमेकांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.
सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पण, धक्कादायक म्हणजे यातील सागर जाधव हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही टोळ्यांमधील गुंड हे भांडूपमधील आहेत. सागर जाधव आणि आदित्य क्षीरसागर हे दोघे ऐरोली मधल्या गरम मसाला हॉटेलमध्ये आल्याचे कळताच अमित मोघले हा देखील तिथे आला आणि धमकवण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही टोळ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. येथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या घटनेचा बारकाईने तपास सध्या पोलीस करीत आहेत. मात्र, नवी मुंबईत पुन्हा गँगवॉरच्या घटनेने नवी मुंबईकरांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.