मुंबई - घाटकोपर येथील 10 मजली श्रीजी टॉवरच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. आगीत लताबेन भाटीया ही वृध्द महिला आणि अग्निशमन दलाचा एक जवान मिलिंद वारणकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, या ठिकाणाहून 20 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळ श्रीजी टॉवर आहे. 10 मजली टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील रुम नंबर 501 मध्ये सायंकाळी 6 वाजता आग लागली. लाकडी साहित्य, विद्युत वायर, देव्हारा, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, शिलींग आदी ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली. ही आग सहाव्या मजल्यावरील 601 पर्यंत गेली. यातही घरातील वस्तू जळून खाक झाल्या.
अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य हाती घेतले. टॉवरला लागून असलेल्या झाडांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडथळा येत होता. मात्र, टॉवरच्या टेरेसवरुन 20 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. यामध्ये 1 दिव्यांग, एका वयोवृध्देसह 15 महिलांचा समावेश होता.
लताबेन भाटीया (85) आणि मिलींद वारणकर (45) हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. धुराचा त्रास झाल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आगीचे कारण आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची टॉवरने अंमलबजावणी केली होती का, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.