मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणाचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. यामुळे अग्निशमन दलातील 91 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा आठवर पोहोचला आहे.
आग लागणे, इमारत, घर किंवा त्याचा काही भाग कोसळणे, झाड किंवा त्यांच्या फांद्या पडणे, नाल्यात पडणे, समुद्रात वाहून जाणे, गॅस गळती होणे, आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य आदी वेळी मुंबईत अग्निशमन दलाला बोलावले जाते. मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या इमारतीत, चाळीत औषध फवारणी करून तो परिसर मुंबई अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीरण केला जातो. त्याच प्रमाणे कोरोनाच्या रुग्णांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्याठिकाणीही अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीरण केले जात आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम करणाऱ्या अग्निशमन दलातील 91 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 33 जण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर 22 जण रुग्णालयात उपचार घेत असून 28 जण विविध ठिकाणी क्वारंटाईन आहेत. अग्निशमन दलाच्या विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील 54 वर्षीय फायरमन सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना झाल्याने उपचार घेत होते. त्यांचा शनिवारी (दि. 13 जून) मृत्यू झाला. अग्निशमन दलातील हा आठवा मृत्यू आहे.
हेही वाचा - मुंबईत 'इन्फ्रारेड'च्या माध्यमातून स्क्रिनिंग; सीएसएमटी, एलटीटीवर कार्यरत